1 शिवनेरी हे नाव ऐकताच आपल्या डोळ्यांसमोर छत्रपती शिवाजी महाराज यांचीच मूर्ती उभी राहते. याच शिवनेरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता.

2 महाराष्ट्र राज्यात पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात हा शिवनेरी किल्ला अत्यंत दिमाखात उभा आहे. पुणे जिल्ह्यात असलेल्या नाणेघाट या डोंगरावरील हा किल्ला आजही अत्यंत सुस्थितीत आहे.

3 या किल्ल्याची स्थापना इ.स. 1170 मध्ये यादव राजांनी केली होती. समुद्रसपाटीपासून जवळपास 3500 फूट उंचीवर असलेला हा किल्ला जवळपास 300 मीटर उंच असलेल्या टेकडीवर बांधलेला आहे.

4 जीर्णनगर किंवा जुन्नेर नावाने ओळखले जाणारे जुन्नर शहर शक राजा नहपान याची राजधानी होती. त्या राज्यकर्त्यांनी नाणेघाट या परिसरातील मोठ्या बाजारपेठेमुळे येथे लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधला होता.

5 त्यानंतर सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा पाडाव केला आणि जुन्नर तसेच आजूबाजूचा परिसर जिंकून घेतला. सातवाहनांनी याठिकाणी त्या काळात बांधलेली लेणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात.

6 इ.स.1595 मध्ये जुन्नर प्रांत शिवाजीराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांचे कडे आला. जिजाबाईंचे वडील जाधवराव यांच्या हत्येनंतर 1629 मध्ये जिजाबाई गरोदर असताना शहाजीराजांनी त्यांना शिवनेरीवर नेले.

7 त्यावेळी जिजामातांनी शिवनेरी गडावरील शिवाई देवीला नवस केला की जर मला पुत्र झाला, तर मी त्याचे नाव तुझ्या नावावरून ठेवीन. त्यानुसार जिजाबाईंनी आपल्या पुत्राचे नाव 'शिवाजी' असे ठेवले.

8 त्यानंतर इ.स. 1632 मध्ये जिजाबाईंनी छोट्या शिवाजीसह गड सोडला आणि 1637 मध्ये हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. पुढे 1716 मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी शिवनेरी किल्ला पुन्हा एकदा जिंकून घेतला.

9 त्रिकोणी आकाराच्या टेकडीवर उभ्या असलेल्या शिवनेरी किल्ल्याचा आकार शंकराच्या पिंडीसारखा दिसतो. बालेकिल्ला जिंकायला अत्यंत कठीण आहे. बालेकिल्ला अर्थात किल्ल्यावरील सर्वात सुरक्षित आणि उंचावरील जागा.

10 टेकडीच्या दक्षिण पश्चिम दिशेने असलेल्या मुख्य प्रवेशद्वारात जाण्यासाठी साखळ्यांना धरत जावे लागते, त्यामुळे याला साखळी द्वार असेही म्हटले जाते. त्या साखळीला धरून पर्यटक किल्ल्यावर जाऊ शकतात.

11 गडावर येताना आपल्याला सात दरवाजे लागतात. त्यातील पहिला महादरवाजा, दुसरा पीर दरवाजा, तिसरा परवानगीचा दरवाजा, चौथा हत्ती दरवाजा, पाचवा शिपाई दरवाजा, सहावा फाटक दरवाजा आणि सातवा कुलाबकर दरवाजा लागतो.

12 गडावर असलेल्या जन्मघरातील शिवाजी महाराजांचा बालपणीचा पाळणा पाहून प्रत्येक शिवप्रेमी तेथे नतमस्तक झाल्याशिवाय आणि त्याच्या डोळ्यात आसवे आल्याशिवाय राहत नाही.

13 तसेच किल्ल्याच्या दक्षिण बाजूला जिजाबाई व बाल शिवाजीचे मनमोहक पुतळे आहेत. या दोन्ही पुतळ्यांना पाहून शिवाजी महाराजांचा रोमांचित करणारा इतिहास नक्कीच आपल्या डोळ्यासमोर येईल.

14 किल्ल्यावर 'बदामी तलाव' नावाचा पाण्याचा तलाव तसेच गंगा, यमुना नावाचे पाण्याचे झरे सुद्धा आहेत. त्यामुळे किल्ल्यावर वर्षभर पिण्याचे पाणी उपलब्ध असते.

15 पुण्यापासून शिवनेरी किल्ल्याचे अंतर हे अंदाजे 105 किलोमीटरचे आहे. पुणे हे ठिकाण महाराष्ट्रासोबतच इतर राज्यातील जवळपास सर्व मोठ्या शहरांशी रस्ता, रेल्वे व हवाईमार्गाने जोडले गेले आहे.

16  छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान असलेल्या आणि त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा किल्ला पाहण्यासाठी आणि त्यांचा जाज्वल्य इतिहास जाणून घेऊन जीवनभर त्या आठवणी जपण्यासाठी तुम्ही येथे यायलाच हवं!