1 गोवा राज्यातील मांडवी नदीच्या उत्तर काठावर असलेला आग्वाद किल्ला हा कांदोळी समुद्रकिनार्‍यापासून अंदाजे 4 किलोमीटर अंतरावर आहे. इ.स. 1612 मध्ये पोर्तुगीजांनी या किल्ल्याची निर्मिती केली.

2 आग्वाद या शब्दाचा पोर्तुगीज भाषेत 'पाणी' किंवा 'पाण्याचा स्त्रोत' असा अर्थ होतो. या किल्ल्यावर गोड्या पाण्याचा तब्बल 24 लाख गॅलन इतका पाण्याचा साठा आहे. यावरूनच या किल्ल्याला आग्वाद हे नाव पडले.

3 या किल्ल्यावरील गोड्या पाण्याच्या स्त्रोतातून इथे येणाऱ्या जहाजांना पाणीपुरवठा होत असे. संपूर्ण आशिया खंडातील सर्वात मोठ्या गोड्या पाण्याच्या साठयापैकी एक म्हणून हा किल्ला ओळखला जायचा.

4 त्या काळात हा किल्ला पोर्तुगीजांची राजधानी म्हणून ओळखला जायचा. 19 व्या शतकात पोर्तुगीजांनी या किल्ल्यावर तुरुंग बांधला. 2011 पर्यंत या तुरुंगाचा उपयोग केला जात होता.

5 मांडवी नदी ज्या ठिकाणी समुद्राला मिळते, त्या किनाऱ्याजवळच या किल्ल्याची निर्मिती करण्यात आली आहे. मराठी आणि डचांच्या फौजांपासून संरक्षण मिळवण्यासाठीच पोर्तुगिजांनी या किल्ल्याची निर्मिती केली. 

6 या किल्ल्याचे मुख्यतः दोन भाग पडतात. वरील आग्वाद किल्ला आणि खालील आग्वाद किल्ला. याच्या खालच्या भागात जाण्यासाठी आपल्याला जवळपास 3 किलोमीटरचा वळसा घालून ताज फोर्ट आग्वाद या हॉटेल जवळ जावे लागते.

7 तसेच या किल्ल्यावरील एक सुंदरशी वास्तू म्हणजे 1864 मध्ये बांधण्यात आलेला दीपस्तंभ. हा दिपस्तंभ आशिया खंडातील सर्वात जुना दीपस्तंभ मानल्या जातो. 1976 मध्ये यांच्या जागी नवा दीपस्तंभ बांधण्यात आला.

8 सुरुवातीच्या काळामध्ये हा दीपस्तंभ 7 मिनिटात एकदा प्रकाश उत्सर्जित करण्यासाठी वापरला जात असे. तसेच या दीपस्तंभावर जुन्या गोव्यातील सेंट ऑगस्टस मठातील एक मोठी घंटा देखील होती.

9 या दीपस्तंभावर त्याकाळी जवळपास 79 भव्य तोफा ठेवल्या जायच्या. सामरिकदृष्ट्या पोर्तुगिजांचा सर्वात मौल्यवान आणि महत्त्वाचा म्हणून हा किल्ला गणल्या जायचा.

10 तसेच या किल्ल्यावरील वरच्या भागातील खंदक, गन पावडर रूम, पाणी साठवण कक्ष, बुरुज तसेच आणीबाणीच्या वेळी निसटण्यासाठी गुप्त मार्गसुद्धा आहेत.

11 गोवा पर्यटन विकास महामंडळ आणि गोवा हेरिटेज ॲक्शन ग्रुपच्या वतीने  किल्ल्याचे नूतनीकरण करण्यात आले आहे. तसेच गोवा मुक्ती संग्रामात लढलेल्या  वीरांचे स्वातंत्र्यसंग्राम संग्रहालय सुद्धा उभारले आहे.

12 या स्वातंत्र्य संग्राम संग्रहालयाचे उद्घाटन पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचे हस्ते 19 डिसेंबर 2021 रोजी करण्यात आले. स्वदेश दर्शन योजनेतून पुनर्विकासासाठी अंदाजे 22 कोटी रुपये खर्च आला आहे.